Sunday , September 20 2026
Breaking News

आयएसआयसाठी युवक भरती प्रकरणी ईडीची कर्नाटकातील ८ ठिकाणी धाड

Spread the love

 

बंगळूर : आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसाठी युवकांची भरती, त्यासाठी बेकायदेशीर निधी संकलन आणि आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी बंगळुरसह कर्नाटकातील आठ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.

राष्ट्रीय तपास संस्थे (एनआयए)ने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपासाला गती दिली आहे. या कारवाईत ‘इक्रा वेल्फेअर ट्रस्ट’, ‘गायडन्स फॉर मॅनकाइंड’ या संस्थांशी तसेच काही संशयित व्यक्तींशी संबंधित ठिकाणांची झडती घेण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणात एनआयएने यापूर्वीच पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींचे आयएसआयएसशी संबंध असल्याचा आरोप असून, निष्पाप मुस्लिम युवकांना कट्टरतावादाकडे वळवून दहशतवादी संघटनेत सहभागी करण्यासाठी त्यांनी गुप्त कट रचल्याचा दावा एनआयएने केला आहे.

तपासानुसार, ‘इक्रा कॅम्प’ या व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या नावाखाली तसेच ‘कुराण सर्कल’ या साप्ताहिक बैठकींद्वारे युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांची आयएसआयएसमध्ये भरती केली जात होती. याशिवाय, विविध मार्गांनी निधी गोळा करून बनावट व बेकायदेशीर माध्यमांतून युवकांना तुर्कस्तानमार्गे सिरियाला पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत होती, असेही आरोपपत्रात नमूद आहे.

एनआयएच्या माहितीनुसार, भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या सिरिया सरकारविरोधात लढण्यासाठी युवकांना भडकविण्याचे प्रयत्न या गटाकडून करण्यात येत होते.

तसेच, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधातील आंदोलनांच्या काळात गुप्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून युवकांना आयएसआयएसच्या विचारसरणीकडे आकर्षित करण्यात येत होते. त्यांना सिरियाला पाठविण्यासाठी काही व्यक्ती आणि ट्रस्टमार्फत निधी उभारण्यात आल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *