
पाच वर्षांच्या बालिकेसह चौघे गंभीर जखमी
कोलार : तिरुपती येथील तिरुमला मंदिरात दर्शन घेऊन बंगळुरूकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच वर्षांच्या बालिकेसह चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी पहाटे कोलार जिल्ह्यातील केजीएफ तालुक्यातील दोड्डकारी गावाजवळ चेन्नई-बंगळुरू एक्स्प्रेसवेवर घडला.
बंगळुरूतील विद्यरण्यपुर येथील रहिवासी विकास यांच्या कुटुंबीयांसह म्हैसूर येथील नातेवाईक मिळून ६ सप्टेंबर रोजी तिरुपतीला गेले होते. दर्शन आटोपून सोमवारी पहाटे सुमारे ३ वाजता टोयोटा रुमिऑन कारमधून आठ जण बंगळुरूकडे निघाले होते.
सकाळी सुमारे ६.४५ वाजता दोड्डकारी गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडक दिली. त्यानंतर कार पलटी होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पडली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये शारदाबाई (७०), देवेंद्रकुमार (४४), दीक्षिता (२०) आणि जिष्णुसाई (१२) यांचा समावेश आहे. तर कविता, पाच वर्षांची अद्विका, नीतुराव आणि कारचालक विकास हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्रथम बंगारपेट सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना बंगळुरूतील रुग्णालयात हलविण्यात आले.
अतिवेग आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप असून, मृतांचे नातेवाईक राकेश यांनी चालक विकासविरोधात कठोर कारवाईची मागणी करत तक्रार दाखल केली आहे. केजीएफचे एसपी शिवांशू राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेथमंगळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
नव्या एक्स्प्रेसवेवर वाहनांचा वेग वाढत असल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करून सुरक्षित वाहनचालक करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta