बेळगाव : येथील कॅपिटल वन या संस्थेतर्फे घेण्यात येणऱ्या एसएसएलसी व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ज्योती कॉलेजच्या सभागृहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मराठा को.ऑपरेटीव्ह बँकेचे चेअरमन श्री. दिगंबर पवार, संस्थेचे व्हा चेअरमन शाम सुतार, मराठी विषयाचे तज्ञ श्री. सि. वाय. पाटील व श्री. बी. एम. पाटील सर उपस्थित होते.
‘व्याख्यानमालेची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दिपप्रज्वलन करून करण्यात आली. संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजी हंडे यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यांनी विद्यार्थीवर्गाला उद्देशून विद्यार्थी वर्गानी आपल्या भावी आयुष्याची सुरुवात म्हणून या दहावीच्या परिक्षेला निर्भिडपणे सामोरे जाऊन पुढे वाटचाल करावी असे मत व्यक्त केले. दिगंबर पवार यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून कॅपिटल वनने आयोजित केलेल्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी परिक्षेत येणऱ्या अभ्यासातील लहान सहान अडचणी व बारकावे समजून घ्यावे असे सांगितले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक रामकुमार जोशी, सदानंद पाटील, शिवाजीराव अतिवाडकर, शरद पाटील, लक्ष्मीकांत जाधव कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक सदानंद पाटील यांनी केले.