लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात खानापूर म. ए. समितीकडून जनजागृती
खानापूर : गेली 66 वर्ष अनेक संकटे झेलून कोणत्याही आमिषाला बळी न पडता शासनाच्या दडपशाहीला न जुमानता निष्ठावंत सीमा सत्याग्रहींनी सीमाप्रश्नाची चळवळ अखंडपणे तेवत ठेवली आहे. सध्या सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असताना चळवळ तीव्र ठेवणे गरजेचे आहे. अशावेळी मतभेदांना दूर ठेवत चळवळीला बळकटी द्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते संभाजी देसाई यांनी केले.
लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्राचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आठ सदस्य समितीचा शुक्रवारी दौरा झाला. त्याप्रसंगी कापोली येथे ते बोलत होते.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुनर्रचनेसाठी समितीच्या आठ सदस्यांसह इतर ज्येष्ठ नेत्यांनी तालुक्याच्या दौर्याला सुरुवात केली आहे. शुक्रवारी लोंढा जिल्हा पंचायत विभागातील प्रमुख गावांना भेटी देऊन कार्यकारिणी रचनेसाठी सदस्य द्यावेत, असे आवाहन केले.
दरम्यान गुंजी येथे बैठक झाली. यावेळी यशवंत बिर्जे, गोपाळ देसाई, रमेश धबाले, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी महामोर्चा जागृती संदर्भातील पत्रके वाटली दिनांक 19 रोजी होणार्या समितीच्या महामेळाव्याला लोंढा विभागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील त्यासाठी प्रत्येक गावात जनजागृती करण्यात येत आहे.
चळवळ गतिमान ठेवण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा असून तरूणांनी राष्ट्रीय पक्षांच्या आमिषांना बळी न पडता मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी चळवळीत सामील व्हावे, असे आवाहन दीपक देसाई यांनी केले.
यावेळी वसंत बांदोडकर, हनुमंत जोशीलकर, सुभाष घाडी, सदानंद देसाई, दादा देसाई, नारायण घाडी, शिवाजी गोडसे, महादेव गोरल, राजाराम देसाई मुरलीधर पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, आबासाहेब दळवी आदी उपस्थित होते.