कणकुंबी (वार्ताहर) : खानापूर तालुका महिला आणि बाल कल्याण खाते, कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कणकुंबी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पौष्टिक आहार मासाचरण कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष रमेश रामचंद्र खोरवी होते.
यावेळी कणकुंबी केंद्रातील सतरा आणि जांबोटी उपकेंद्रातील 27 अशा एकूण 44 अंगणवाडी केंद्राच्या वतीने पौष्टिक आहार मासाचरण दिनाच्या निमित्ताने पौष्टिक आहार प्राशन, गर्भवतींचा सत्कार आणि पौष्टिक घटक आहाराचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी बेळगाव येथील महिला आणि बाल खात्याच्या अधिकारी श्रीमती कविता होसमनी, ग्रा. पं. अध्यक्ष रमेश खोरवी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. चेतन, ग्राम पंचायतचे पीडीओ सुनिल अंबारे, ता. पं. सदस्या श्रीमती पुष्पा नाईक आणि देवस्थानचे उपाध्यक्ष राजाराम गावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पौष्टिक आहार अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. येथील माऊली विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या स्वागत पद्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक व पत्रकार एस. जी. चिगुळकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला, तर तालुका महिला आणि बालकल्याण खात्याच्या सुपरवायझर श्रीमती एस. एम. कुलकर्णी तसेच अंगणवाडी शिक्षिका साधना पेडणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. केंद्र सरकारने गेली तीन वर्ष सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पौष्टिक आहार मासाचरण म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगितले जाते. गर्भवती महिलासह बालकांच्या पौष्टिक आहाराबद्दल मार्गदर्शन करून उत्तम आरोग्य राखण्यासाठी विविध जीवनसत्त्व आणि घटक असलेले पदार्थ आहारामध्ये अत्यावश्यक आहेत. त्याचबरोबर गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलीनाही भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असून समतोल राखण्यासाठी पालेभाज्या, मोड आलेली कडधान्यं तसेच जंगलातील काही भाज्या आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत. गर्भवती महिलांनी प्रत्येक दोन तासांनी थोडा थोडा आहार घेऊन चांगली काळजी घेतल्यास बाळ सुद्धा सदृढ व निरोगी होऊ शकते. तसेच महिलांवर्गासाठी सरकारच्या अनेक योजना असून त्याचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन बेळगाव जिल्हा महिला आणि बाल कल्याण खात्याच्या अधिकारी श्रीमती कविता होसमनी यांनी केले. यावेळी कणकुंबी ग्रामपंचायत पिडिओ सुनील अंबारे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चेतन व महिला आरोग्य अधिकारी बाळव्वा तळवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कणकुंबी केंद्रातील अंगणवाडी शिक्षिका साधना पेडणेकर व पुष्पा बांदेकर, चिगुळे शिक्षिका सौ. निता धामणेकर, पारवाड शिक्षिका उषा गावडे, चोर्ला शिक्षिका सौ. सुधा गवस, चिखले गंगुबाई पाटील, तळावडे रंजना कुलम तसेच कणकुंबी आणि जांबोटी केंद्रातील अंगणवाडी शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.
Check Also
गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश
Spread the love खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …