Sunday , May 10 2026
Breaking News

श्री नागेश महारुद्र मंदिर कळस शोभायात्रा भक्तिमय वातावरणात

Spread the love

 

खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या श्री नागेश महारुद्र मंदिराच्या कळसाची भव्य शोभायात्रा सोमवार, दि. २० एप्रिल रोजी मोठ्या उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. परिसरातील शेकडो भाविकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कळस व देवमूर्तींचे दर्शन घेतले.

देसाई गल्लीतील निरंजन सरदेसाई यांच्या घरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. पारंपरिक वाद्य टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात वातावरण दुमदुमले. शोभायात्रा मलप्रभा नदी घाटावर आल्यावर मलप्रभा नदीच्या पाण्याने कळसाला व देवमुर्त्यांना श्री नागेश मंदिर कमिटीचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या शुभहस्ते स्नान घालून पूजन करण्यात आले. तसेच मलप्रभा नदीघाटावरील श्री पंचमुखी महादेव मंदिर येथे ज्ञानेश्वर पाटील, महादेव मरगाळे यांचे उपस्थितीत व अर्बन बँक परिसरातील श्री नागेश मंदिर (देवघर) येथे पुजारी गावडे-पाटील, अतुल पाटील आदिंच्या उपस्थितीत नारळ ठेऊन आशिर्वाद घेण्यात आला व नंतर देसाई गल्लीत निरंजन सरदेसाई यांचे घरी कळस व विविध दैवतांच्या मूर्त्यांना महिलांकडून हळदि-कुंकू घालून ओवाळण्यात आले व मग घोडे गल्ली, निंगापूर गल्ली, शिवस्मारक, स्टेशन रोड या मार्गाने लक्ष्मी मंदिर येथे आल्यावर श्री लक्ष्मीदेवी मंदिराचे पूजारी गावडे यांचेकडून कळसाला ओवाळण्यात आले.

त्यानंतर यात्रेत सहभागी भाविक सरदेसाई यांचे घरी अल्पोपहार घेऊन विठोबा देव गल्ली, गुरव गल्ली मार्गे रवळनाथ मंदिर येथे पोहोचले. तेथे पुजारी गुरव यांचेकडे श्री रवळनाथाला नारळ ठेऊन ग्रामदैवताचा आशिर्वाद घेण्यात आला. त्यानंतर घाडी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक मार्गे पारिश्वाड क्रॉस येथून मार्गक्रमण करत चौराशी देवी मंदिराला भेट देऊन नारळ ठेवण्यात आला. त्यानंतर थेट विश्रांतवाडी येथे दुपारच्या भोजनासाठी थांबण्यात आले. भोजनानंतर शोभायात्रा नागुर्डा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे प्रस्थान करत गावातील प्रमुख मार्गांवरून नेण्यात आली. नागुर्डा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अभिजित सरदेसाई यांच्या हस्ते अनंत चापगांवकर व गुरव तानाजी चापगांवकर यांच्या उपस्थितीत नारळ विडा देवाकडे ठेवण्यात आला. अखेरीस नागुर्डावाडा येथील गणपती मंदिराजवळ शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी दारात रांगोळ्या काढल्या होत्या. महिलांनी आरती करून फुले वाहून कळसाचे औक्षण केले. सारे वातावरण भक्तिमय झाले होते. या सोहळ्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष श्री निरंजन उदयसिंग सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. तसेच कमिटीचे सदस्य अभिजित सरदेसाई, कृष्णा धुळ्याचे, रवळू वडगांवकर, बाळू बीर्जे, नागेश पारवाडकर, मारूती पाखरे, ज्ञानेश्वर पाटील, नारायण महाजन, अशोक पाटील, राघोबा चापगांवकर, राजू पालकर, नामदेव पाटील, नागेश पाटील(पुणे), मारूती पाटील, बाबुराव खन्नुकर, मारूती देसूरकर, शिवाजी देसूरकर, तसेच धाकलू बिर्जे, विनोद बिर्जे, कृष्णा महाजन, दत्ता महाजन, हणमंत पाखरे, विनायक अशोक पाटील, राजू ठोंबरे, दुर्गाप्पा महाजन, लक्ष्मण झुंजवाडकर, शुभम महाजन, भरत नांदूरकर, जिवणू पाखरे तसेच विश्रांतवाडी, नागुर्डा व नागुर्डावाडा येथील भजनी मंडळ, महीलावर्ग व स्थानिक ग्रामस्थांनीही नियोजनात मोलाचे योगदान दिले. या शोभायात्रेमुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले.

About Belgaum Varta

Check Also

“बापू गेले…”; अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर यांनी व्यक्त केल्या भावना

Spread the love  मी दीड वर्षांचा असताना बापू मला आत्त्याकडं कोल्हापूरला सोडून गेले. गावात पोर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *