

गुंजी येथे बस थांब्यासाठी निवेदन
खानापूर : बेळगाव बसस्थानक ते चोर्ला नवीन बससेवा सुरू करावी तसेच या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय दूर करावी, या मागणीसाठी सरकारी हमी योजना अंमलबजावणी समिती, खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सूर्यकांत के. कुलकर्णी यांनी एनडब्ल्यूकेएसआरटीसीच्या बेळगाव विभागीय नियंत्रकांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल हमी योजनेच्या नुकताच झालेल्या जिल्हा स्तरीय बैठकीत घेण्यात आली आहे.
बेळगाव ते चोर्ला नवीन बस सुरू करावी आणि बेळगाव व गोव्याहून चोर्ला मार्गे धावणाऱ्या बस याठिकाणी थांबा पाहिजे त्यासाठी 24 जानेवारी 2025 पासून सतत पाठपुरावा केला आहे. मात्र बस न थांबल्याने शालेय विद्यार्थी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने सूर्यकांत कुलकर्णी यांनी बैठकीत निवेदन आणि माहिती प्राधिकरणाचे राज्याउपाध्यक्ष एस. आर. पाटील व जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी यांना दिली
यावेळी कर्नाटक राज्य सरकारी हमी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे राज्याउपाध्यक्ष एस. आर. पाटील यांनी सदर निवेदनाची गंभीर दखल घेत जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून संबंधित मार्गावरील बससेवा सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बेळगाव ते चोर्ला नवीन बस सुरू करावी तसेच या मार्गाने धावणाऱ्या सर्व बसेसनी चोर्ला येथे नियमित थांबा द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या दहा दिवसांच्या आत बेळगाव–चोर्ला मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

गुंजी येथे बेळगाव-रामनगर एक्सप्रेस बसला थांबा द्यावा; सूर्यकांत कुलकर्णी यांची मागणी
गुंजी गावामार्गे धावणाऱ्या बेळगाव–रामनगर मार्ग क्रमांक ४६ च्या एक्सप्रेस बसला गुंजी येथे अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी ही झालेल्या बैठकीत अध्यक्ष सूर्यकांत के. कुलकर्णी यांनी एनडब्ल्यूकेएसआरटीसीच्या विभागीय नियंत्रक, बेळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गुंजी हे सुमारे ८ हजार लोकसंख्येचे मोठे गाव असून येथे उप-तहसीलदार कार्यालय तसेच नोंदणी कार्यालय कार्यरत आहे. त्यामुळे गावात दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते.मात्र बस थांबत नसल्याने त्यांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले आहे.या निवेदनाची प्राधिकरणाचे राज्याउपाध्यक्ष एस. आर. पाटील व जिल्हा अध्यक्ष विनय नवलगट्टी यांनाही देण्यात आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta