मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ईडीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी संजय राऊत यांनी 14 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. ईडीने ही विनंती स्वीकारली आहे. त्यामुळे संजय राऊत चौकशीसाठी आता 14 दिवसांनी ईडी कार्यालयात हजर राहतील. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना हे समन्स बजावलं आहे.
महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या गटासह केलेल्या बंडामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि राज्यात सत्तासंघर्षाची ठिणगी पेटली. राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावत 27 जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं.
परंतु अलिबागमधील नियोजित दौर्यामुळे संजय राऊत चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने वकील उपस्थित राहिले आणि त्यांनी 14 दिवसांनी कागदपत्रांसह हजर होण्याचा विनंती अर्ज सादर केला. जो आता ईडीने स्वीकारला आहे.
