मुंबई : टेस्ला आणि ट्विटरचे प्रमुख एलॉन मस्क यांनी आपल्या नव्या ट्वीटमध्ये ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर वापरकर्त्यांनाच आपल्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला. तसेच ट्विटर वापरकर्ते जो कौल देईल त्याप्रमाणे आपण करू असं म्हटलं आहे. त्यांचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही एलॉन मस्क यांना उद्देशून एक ट्वीट केलं आहे.
“.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्वीट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. इलॉन मस्क, आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ?” असं जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या खात्यावरून झालेल्या वादग्रस्त ट्वीटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या अगोदर हल्लाबोल केला आहे. ते ट्वीट माझं नाही असं म्हणणं धादांत खोटं आहे आणि हा खोटेपणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निमूटपणे सहन करत आहेत, असा आरोप जयंत पाटलांनी शुक्रवारी (१६ डिसेंबर) सांगलीत केला होता.