नवी दिल्ली : चीनने जगभरात घुसखोरी सुरु केली आहे. त्याच पद्धतीनं कर्नाटक राज्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापुरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी आग लावण्याचं काम करत असल्याचे राऊत म्हणाले. दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं हे बोम्मई मानायला तयार नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तोंड गप्प असल्यामुळं बोम्मई जास्त बोलत असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेनं बोम्मई यांच्या विरोधात ठराव करुन तो मंजूर केला पाहिजे असेही राऊत म्हणाले. संजय राऊत चीनचे एजंट असल्याचे वक्तव्य बोम्मई यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेला राऊतांनी आज दिल्लीत प्रत्युत्तर दिलं.
आमची भाषा कायद्याची तर बोम्मईंची फायद्याची
आम्हाला कर्नाटकची जमीन नकोच आहे. आमच्या हक्काच्या बेळगावसह जी गावं आमची आहेत त्यावर आमचा दावा आहे. हा आमचा दावा कायदेशीर असल्याचे राऊत म्हणाले. आमची कायद्याची भाषा आहे तर बोम्मईंची फायद्याची भाषा असल्याचे राऊत म्हणाले. या सर्व विषयावर महाराष्ट्रातील सरकार तोंड बंद करुन गप्प आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात कोणताही सांस्कृतिक वाद नाही. हा वाद जनतेमध्येही नाही. हा वाद राजकीय फयद्यासाठी लावला जात असल्याचे राऊत म्हणाले. आम्ही चीनचे एजंट आहोत तर तुम्ही कोणाचे एजंट आहात? असा सवाल राऊतांनी बोम्मईंना केला. देशाच्या गृहमंत्र्यांसमोर एखादी गोष्ट ठरली असेल तर तुम्ही का मानत नाहीत? असा सवालही राऊतांनी बोम्मईंना केला.
बोम्मई यांच्यावर खटला दाखल करा
ज्याप्रमाणे कर्नाटक राज्यानं महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभेतही बोम्मई यांच्या विरोधात ठराव करुन तो मंजूर केला पाहिजे असेही राऊत यावेळी म्हणाले. आमच्यावर तुम्ही खटले दाखल करता. तुम्ही मराठी मातीचे इमानदार पाईक असाल तर बोम्मई यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याप्रकरणी खटला दाखल करा असं आव्हान राऊतांनी सरकारला दिलं. तुमचा काही भरोसा नाही, उद्या तुम्ही त्यांनाही क्लिट चीट द्याल असे राऊत म्हणाले. काल ज्या पद्धतीची ठरावात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भाषा केली अशी भाषा यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी कधीच केली नव्हती असेही राऊत म्हणाले.