मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पहाता हे पद गेली दीड वर्ष रिक्त ठेवल्याने विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळे आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. गेल्या काही महिन्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यात राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांचा मुद्दाही प्रामुख्याने पुढे आला आहे. त्यामुळे चाकणकर यांची नियुक्ती केली जाणार असून त्यावर महाविकास आघाडीत एकमत झाले आहे. अन्य महामंडळावरील नियुक्त्याही लवकरच केल्या जाणार असल्याचे समजते.
