Sunday , July 26 2026
Breaking News

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू

Spread the love

 

मुझफ्फराबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादजवळ पाकिस्तान लष्कराच्या एव्हिएशन विंगचे Mi-17 हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात वैमानिकासह हेलिकॉप्टरमधील सर्व 20 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर लष्कर व स्थानिक प्रशासनाच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

प्राथमिक माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने कोसळले. पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या निवेदनात तांत्रिक अडचणींमुळे हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. तथापि, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही घटना पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यात घडल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर संपूर्ण परिसराला सुरक्षा घेरा घालण्यात आला असून, ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असले तरी मृत जवानांची नावे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

दरम्यान, या भीषण दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान लष्कराने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडाचा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी घातपाताची शक्यताही नाकारण्यात आलेली नसून सर्व अंगांनी तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी बलुचिस्तानमध्येही पाकिस्तान लष्कराचे एक हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. त्यामुळे सलग घडलेल्या या घटनांमुळे पाकिस्तानच्या लष्करी विमान सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *