








भागलपूर : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात कर्म-धर्म पर्वानिमित्त तलावात स्नान करण्यासाठी गेलेल्या सहा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. २१) सकाळी घडली. मृतांमध्ये तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश असून, त्यांचे वय १२ ते १३ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे.
सुल्तानगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती कुमारी, मीनाक्षी कुमारी, आयुष कुमार, राहुल कुमार, पूजा कुमारी आणि विकास कुमार अशी मृतांची नावे आहेत. ज्योती कुमारी वगळता अन्य सर्वजण विष्णू टोला, वॉर्ड क्रमांक २७ येथील रहिवासी होते. राहुल आणि पूजा ही सख्खी भावंडे होती.
कर्म-धर्म पर्वानिमित्त ही मुले एकत्र तलावात स्नान करण्यासाठी गेली होती. यावेळी एक मुलगा खोल पाण्यात गेल्याने बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी इतर मुलांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मुलांना तलावातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी सहाही मुलांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

Belgaum Varta Belgaum Varta