








ग्रेटर नोएडा : यमुना एक्सप्रेस वेवर धावत्या खासगी डबल डेकर स्लीपर एसी बसला अचानक आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेत 9 प्रवाशांचा मृत्यू झाला. काही प्रवाशांचा आगीत होरपळून तर काहींचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती आहे. बसमध्ये सुमारे 35 प्रवासी होते.
नोएड्याहून महोबाच्या दिशेने निघालेली ही बस आग्र्याच्या दिशेने जात असताना दयानतपूर गावाजवळ अचानक बसमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. चालकाने प्रसंगावधान राखत बस एक्सप्रेस वेच्या कडेला थांबवली. मात्र काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला वेढले आणि बस आगीचा गोळा बनली.
आग लागल्याचे समजताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड आणि पळापळ सुरू झाली. झोपलेल्या प्रवाशांना परिस्थिती समजण्यापूर्वीच बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला.
दुर्घटनेतून बचावलेल्या एका प्रवाशाने सांगितले, “मी झोपलो होतो. त्याचवेळी कोणीतरी दरवाजा ठोठावला. डोळे उघडले तेव्हा चारही बाजूंना धूर होता. आरडाओरड सुरू होती. मी सामान किंवा बूट काहीही घेतले नाही; फक्त फोन हातात घेऊन बाहेर पळालो.”
घटनेची माहिती मिळताच यमुना एक्सप्रेस वेचे सुरक्षा कर्मचारी, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य करून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून, जखमींना आवश्यक ते उत्तम उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta