नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना आणखी एक दिलासा देत केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल हेच राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर ते तिहार तुरुंगात होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला. पण १ जूनला केजरीवाल यांना पुन्हा आत्मसमर्पण करावे लागणार आहे. केजरीवाल यांना ज्यावेळी ईडीकडून अटक झाली होती. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या काही नेत्यांनी केली होती. मात्र, आपण दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालवणार अशी भूमिका केजरीवालांनी घेतली होती.
यानंतर केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात यावे, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. यानंतर सर्वोच्च न्यायालयात केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात यावे, यासाठी याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.