मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेला ट्रॅक्टर अचानक उलटला. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला, तर १५ हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये महिला पुरुष तसेच लहान मुलांचा समावेश आहे.
स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना बाहेर काढण्यात आले. आरोग्य विभागाने १० हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. या रुग्णवाहिकांमधून जखमी आणि मृतांना रुग्णालयात आणण्यात आले.
सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त व्यक्ती हे राजस्थानच्या मोतीपुरा गावातील रहिवासी आहे. रविवारी रात्री ते लग्नासाठी ट्रॅक्टरने मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यात येत होते.
या ट्रॅक्टरमध्ये सुमारे २० ते २५ वऱ्हाडी होते. दरम्यान, मध्य प्रदेशातील राजगडमध्ये प्रवेश करताच ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर गेला. रात्रीच्या अंधारात ट्रॉली उलटली आणि सर्व वऱ्हाडी ट्रॉलीखाली दबले गेले. यात महिला, पुरुष तसेच लहान मुलांचाही समावेश होता. ट्रॅक्टर अपघातग्रस्त होताच घटनास्थळी मोठी आरडाओरड झाली. वऱ्हाडी मंडळींचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने अपघातस्थळी बचावकार्य केले. या घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. “मध्य प्रदेशातील राजगढ येथे रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींवर तातडीने उपचार व्हावे तसेच ते लवकर बरे व्हावेत”, असं मुर्मू यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.