रावसाहेब पाटील : परिपत्रक मागे घ्यावे
निपाणी (वार्ता) : जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून झारखंड सरकारने जाहीर केले आहे. याचा दक्षिण भारत जैन सभा जाहीर निषेध करीत आहोत.
जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र अपवित्र व प्रदूषित करणारा हा झारखंड सरकारचा निर्णय केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे तर भारतीय संस्कृती अपवित्र करणारा आहे. तो निर्णय तातडीने मागे घेऊन शिखरजीचे पावित्र अबाधित ठेवावे, असे पत्रक दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा) व पदाधिकारी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकामधील माहिती अशी, भारतीय राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे पवित्र तीर्थक्षेत्रांचे रक्षण व संवर्धन करण्याचा अधिकार अल्पसंख्यांकाचा आहे. सदर तीर्थक्षेत्रे असुरक्षित व अपवित्र होतील, असे कोणतेही कृत्य अथवा व्यवस्था त्याठिकाणी करता येत नाही. देशभरातून लाखो जैन भाविक श्रध्देने सम्मेद शिखरजी दर्शन करतात. पर्यटन स्थळ झाल्यास त्यांच्या उपासनेत व्यत्यय येणार आहे. त्यामुळे झारखंड सरकारने घेतलेला निर्णय हा जैन धर्मिक व अहिंसाप्रेमी लोकांच्या भावना दुखावणारा आहे.
यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब जी. पाटील, व्हा. चेअरमन दत्ता (माधव) डोर्ले, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार अरविंद मजलेकर उपस्थित होते. बुधवारी (ता.२१) भारत बंदमध्ये दक्षिण भारत जैन सभा व जैन समाज सहभागी होऊन अहिंसक मार्गाने निषेध केला आहे. या पुढील काळात उग्र आंदोलन करण्यापूर्वी झारखंड सरकारने हे परिपत्रक मागे घ्यावे असे ही त्यांनी नमूद केले आहे.