Sunday , February 9 2025
Breaking News

कोगनोळी येथे सशस्त्र दरोडा

Spread the love

 

अन्य चार किरकोळ चोरी : दोघे जखमी
कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या घरात अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून दोघांना जबर मारहाण करून दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार तारीख आठ रोजी मध्यरात्री घडली.
सशस्त्र दरोडेखोरांनी मारहाण केल्याने सी. वाय. पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी रोडवर सी. वाय. पाटील यांचे घर आहे. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मागील दाराचा कडी कोयंडा मोडून घरात प्रवेश केला. जेवण खोलीत असणाऱ्या साहित्याची इतरत्र फेकून त्यामध्ये असणारे मौल्यवान वस्तू घेतल्या. यावेळी जेवण खोली लगत असणाऱ्या खोलीत प्रवेश केला असता सी. वाय. पाटील त्यांची पत्नी रेखा पाटील व मुलगी ऐश्वर्या घोरपडे झोपले होते. अज्ञात चोरट्याने खोलीत प्रवेश करताच पाटील यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलगी ऐश्वर्या वडिलांना मारहाण करत असल्याचे पाहून सोडवण्यासाठी गेली असता तिलाही चोरांनी जबर मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अज्ञात चोरट्याने या घरामध्ये असणारे तीस तोळे सोने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. चोर निघून गेल्यानंतर बाहेर येऊन आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले. तात्काळ पाटील व मुलगी ऐश्वर्या यांना कागल येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. पाटील यांना जबर मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
याच रात्री माळी गल्ली येथील संध्या सूर्यवंशी यांच्या घराच्या दाराची कडी मोडून घरात प्रवेश करून किरकोळ चोरी केली. तर याच गल्लीतील सदाशिव माळी यांच्या घराची कडी मोडून घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी त्यांना काही मिळाले नाही. हणबरवाडी रोडवर असणाऱ्या मारुती पाटील यांच्या दाराची कडी मोडून घरात प्रवेश केला. या ठिकाणी किरकोळ चोरी केली. इथूनच काही अंतरावर असणाऱ्या रावसाहेब धना पाटील यांच्या घराचे दार मोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही.
घटनास्थळी चिकोडी डीवायएसपी बसवराज यलगार, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान
चोरीच्या घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वानपथक बोलवण्यात आले. चित्रा या श्वानने घटनास्थळापासून हणबरवाडी रोडवर असणाऱ्या ढोबळे पानंद येथील अशोक मगदूम यांच्या शेतापर्यंत चोरट्यांचा मार्ग दाखवला.

महिन्यात चोरीची दुसरी घटना
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच हालसिद्धनाथ नगर येथील भोपाल कोळेकर यांच्या घरी चोरी झाली होती. या ठिकाणी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. जानेवारी महिन्यातच कोगनोळी गावात चोरीची दुसरी घटना घडली असून नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांना आव्हान
सुरुवातीला किरकोळ स्वरूपाच्या होणाऱ्या चोऱ्या मोठ्या स्वरूपात होऊ लागल्या आहेत. कोगनोळी येथे झालेल्या चोरीमध्ये मोठ्या प्रमाणात मारहान झाल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन या चोरी प्रकरणाचा छडा लावते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आप्पाचीवाडीत मंगळवारी मोफत सीईटी फॉर्म

Spread the love  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, कुरली, हदनाळ, भाटनांगनूर, सुळगाव, मतिवडेसह निपाणी तालुक्यातील बारावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *