निपाणी (वार्ता) : अशोकनगर ते पांडु मेस्त्री यांच्या दुचाकी गॅरेज पर्यंत यापूर्वी चुकीच्या पद्धतीने गटारीचे बांधकाम झाले होते. त्यामुळे बरीच वर्षे या परिसरातील नागरिकांंना पावसाळ्यात बराच त्रास सहन करावा लागला. आता याच भागात नगरपालिकेतर्फे जुनी गटार काढून नवीन गटार बांधली जात आहे. पण सध्या पूर्वीप्रमाणे गटारीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यावर पाणी साठून दलदल निर्माण होणार आहे. तरी नगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने होत असलेले काम थांबून योग्य पद्धतीने काम करण्याची मागणी माजी सभापती विश्वास पाटील यांनी केली आहे.
यापूर्वी पाऊस पडताच गटारीची ढाळ रस्त्याकडेला केल्याने रस्ता पाण्याने व्यापून जात होता. त्यातून दुचाकी जाणेही कठीण होते. नगरपालिकेने परत तिच चुक करून सार्वजनिकांच्या रकमेच्या दुरुपयोग होत आहे. शिवाय परिसरातील नागरिकासह वाहनधारकांना कायम त्रास होणार आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन योग्य पद्धतीने कामकाज न केल्यास निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही विश्वास पाटील यांनी दिला.