Monday , April 20 2026
Breaking News

निपाणीतील रथोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा!

Spread the love
कर्नाटक महाराष्ट्रातील भाविकांची उपस्थिती : गुरूवारी होणार रथोत्सव
निपाणी (विनायक पाटील) : येथील महादेव गल्लीतील श्री महादेव मंदिरामार्फत महाशिवरात्रीनिमित्त साजरा होणारा रथोत्सव म्हणजे असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या या रथोत्सवाने दैदिप्यमान इतिहास व परंपरा जपली आहे. प्रतिवर्षी भव्यदिव्य स्वरुप प्राप्त होणारा श्री महादेवाचा रथोत्सव भाविकांचे आकर्षण ठरला आहे. गुरूवारी (ता.३) हा रथोत्सव होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे.
शहराचे जागृत देवस्थान असलेल्या श्री. महादेव मंदिराच्या यात्रेतील रथोत्सवाची परंपरा श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर सरकार यांच्या कारकिर्दीपासून सुरु आहे. धार्मिक सलोखा, समता आणि सर्वधर्मियांचा सहभाग असे वेगळेपण असलेला हा रथोत्सव म्हणजे महाशिवरात्र उत्सवातील प्रमुख केंद्रबिंदू आहे. मंदिर स्थापनेवेळी येथे ऐतिहासिक व दुर्मीळ असा लाकडी रथ बनवण्यात आला आहे. सुमारे २४ फुट उंचीचा हा रथ आहे. रथोत्सवावेळी रथाची कळसापर्यंत उंची ३५ फूटावर जाते. रथोत्सवात हत्ती, करडी ढोल, झांजपथक, घोडे यांचा समावेश आहे.
महादेव मंदिर ते गांधीचौक, कोठीवाले कॉर्नर, जुने बसवेश्वर पोलिस ठाणे ते पुन्हा महादेव मंदिर अशी महादेव गल्लीतील महादेव मंदिराभोवती रथाची प्रदक्षिणा होणार आहे. महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाल्यापासून मंदिर आवारात शिवकिर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी व श्री वाहन मिरवणूकीसह विविध कार्यक्रम झाले. रथोत्सवाची भव्यता व प्रसिद्धी वाढत असल्याने उत्सवासाठी कर्नाटक, महाराष्ट्रातील हजारो भाविक दाखल झाले आहेत. उत्सवानिमित्त मंदिरात रंगकामासह फुलांच्या सहाय्याने खास सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक मंडप उभारुन विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून गेला आहे.
—–
रविवारी महाप्रसादाचे आयोजन
गुरुवारी दुपारी १ वाजता श्रीमंत दादाराजे निपाणकर – सरकार यांच्याहस्ते रथाची पूजा होईल. यावेळी विविध प्रकारचे सवाल होणार आहेत. त्यानंतर रथोत्सवास प्रारंभ होणार आहे.  मिरवणुकीत विविध प्रसिध्द बॅन्ड, करडी ढोल, संबळ वाद्ये आदीसह हत्ती, घोडे यांचा सहभाग आहे. रविवारी (ता.६) दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कमिटी अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *