Monday , September 21 2026
Breaking News

दहा लाख कि. मी. धावलेल्या भंगार बस रस्त्यावर

Spread the love

 

प्रदूषणासह प्रवाशांचा जीव टांगणीला

निपाणी (वार्ता) : ‘कमी खर्चात आगार चालवायचे आणि प्रशासनाकडून बक्षिसे मिळवायची’ या अधिकाऱ्यांच्या खटाटोपामुळे निपाणी आगारातील बसची अवस्था नाजूक झाली आहे. नियमानुसार बसेस सुरळीत चालण्यासाठी दहा लाख किलोमीटर रनिंगची मर्यादा असताना या आगारात त्यापेक्षा अधिक किलोमीटर धावलेल्या बस अद्यापही प्रवाशांच्या सेवेत धावत आहेत. या भंगार बसेसमुळे एकीकडे वायू प्रदूषण होत असून, दुसरीकडे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
अपुऱ्या सुविधा आणि जुन्या पार्टमुळे बस रस्त्यावर धावताना चालकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिक बिघाडातील बसेसचे पाटे तुटणे, गिअर बॉक्समध्ये वारंवार बिघाड होणे आणि स्टिअरिंग अचानक जाम होण्याचा प्रकार वाढत आहेत. चालकांच्या आसन व्यवस्थेची दुरवस्था झाली असून समोरच्या मुख्य काचा फुटलेल्या व खराब झालेल्या स्थितीत आहेत. प्रवाशांच्या आसन व्यवस्थे जवळील काचा पॅक झाल्या असून उघडणे कठीण झाले आहे.
रस्त्यात कुठेही टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, एक बस दुरुस्तीसाठी पाठवली, की तोपर्यंत दुसरी बस सायलेन्सरमधून काळाकुट्ट धूर ओकत रस्त्यावर धावू लागते, अशी भीषण स्थिती आहे.
या धुराच्या काळवंडामुळे प्रवाशांचे कपडे खराब होत असून स्थानिक नागरिक आणि वाहनचालक या प्रदूषणाने पूर्णपणे वैतागले आहेत. निपाणी- हुपरी मार्गावर धूर सोडणाऱ्या बस धावत आहेत.
——————————————————————–
बसची वारंवार दुरुस्ती
आगारात बसच्या दुरुस्तीसाठी स्पेअर पार्ट वेळेवर येत नाहीत. त्यामुळे जुनेच पार्ट पुन्हा-पुन्हा वापरण्याची ‘किमया’ येथे साधली जात आहे. बससाठी महत्त्वाच्या असणाऱ्या स्प्रिंगची उपलब्धता आगारात नाही. ‘एकाच जुन्या बसची किती वेळा दुरुस्ती करायची?’ अशा संभ्रमात यांत्रिक कामगार पडले आहेत. मात्र, वरिष्ठांच्या दबावामुळे हे दुःख सांगायचे कोणाला, असा प्रश्न कामगारांसमोर निर्माण झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *