

चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचे आवाहन
निपाणी (वार्ता) : भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी दुरुस्तीचे (एस आय आर) काम सुरू आहे. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहावीत, या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. माहिती घेण्यासाठी आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी, असे आवाहन बुडा अध्यक्ष आणि चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी पत्रकान्वये केले आहे.
पत्रकातील माहिती अशी, मतदार संघातील नागरिकांनी कुटुंबातील अपात्र, मृत, स्थलांतरित तसेच दुबार नावे मतदार यादीतून वगळल्याची माहिती द्यावी. बी एल ओ आपल्या घरी येऊन विहित नमुन्यातील अर्ज देतील. त्यामध्ये आपले नाव, कुटुंबातील सदस्यांची माहिती, मतदार ओळखपत्र क्रमांक, पत्ता इत्यादी तपशील आहे. अर्जामध्ये काही चूक असल्यास योग्य माहिती सांगून दुरुस्ती करून घ्यावी. अर्ज नीट भरून त्यावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. बी एल ओ पुन्हा आल्यावर भरलेला अर्ज त्यांच्याकडे जमा करणे गरजेचे आहे. बीएलओनी दिलेली पावती किंवा प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी.
अर्ज देताना साधारणपणे कोणतीही कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. मात्र पुढील काळातनिवडणूक कार्यालयाकडून नोटीस आल्यास त्यांनी मागितलेली कागदपत्रे सादर करावीत. त्यामध्ये आधार कार्ड, जन्म दाखला, शाळेचा दाखला, पासपोर्ट, जात प्रमाणपत्र, कुटुंब नोंदणी, शासकीय ओळखपत्र, पेन्शन आदेश, जमीन,घर वाटप प्रमाणपत्र इत्यादींचा समावेश आहे
आधार क्रमांक देणे बंधनकारक नाही. मात्र तो दिल्यास माहिती पडताळणीस मदत होणार आहे.संबंधित व्यक्ती नोकरीसाठी किंवा इतर कारणाने दुसऱ्या शहरात, राज्यात किंवा परदेशात असल्यास, घरातील सदस्य त्या व्यक्तीची माहिती फॉर्ममध्ये भरून बीएलओकडे देऊ शकतात. एका व्यक्तीचे नाव मतदार यादीत फक्त एका ठिकाणीच असणे बंधनकारक आहे. सध्या ज्या गावात असणाऱ्या मतदार केंद्राच्या बुथमध्ये भरलेला अर्ज जमा करावा.
ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे किंवा निर्धारित पात्रता तारखेपर्यंत १८ वर्षे पूर्ण होणार आहे, त्यांनी फॉर्म-६ भरून नाव नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाइनही अर्ज करता येतो.
मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. नाव नसल्यास फॉर्म ६ भरून नाव समाविष्ट करून घ्यावे. बी एल ओ आपल्या घरी आल्यावर त्यांच्याकडून फॉर्म घेऊन काळजीपूर्वक भरून स्वाक्षरी करून वेळेत परत द्यावे. फॉर्म न दिल्यास मसुदा मतदार यादीत आपले नाव राहण्याची शक्यता कमी होऊ शकते. त्यामुळे कोणीही दुर्लक्ष करू नये. मतदार यादीत आपले नाव योग्यरीत्या कायम राहण्यासाठी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta