
अवघा ६२ टक्के पाऊस
निपाणी (वार्ता) : यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाची निपाणी परिसरात अवकृपा कायम असून ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरविल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्यात २५० मि. मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २२० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे महिनाभरातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत अवघा ६२ टक्केच पाऊस झाला आहे. मध्यंतरीचे एक-दोन पाऊस वगळता ऑगस्ट महिन्यात पावसाचा फ्लॉप शो झाला आहे. त्यामुळे येथील जवाहर तलावातील पाणी पातळी ४४.३ फुटावर स्थिर झाले आहे.
जूनपासून सुरू झालेल्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाने अपेक्षित सरासरी गाठलेली नाही. जून ते ऑगस्ट या ९० दिवसांच्या कालावधीत अपेक्षित झालेला नाही. गतवर्षी याच कालावधीमध्ये अपेक्षित पाऊस झाला होता. त्यामुळे सलग दोन वेळा जवाहर तलाव ओव्हर फ्लो झाला होता. त्यामुळे पालिका प्रशासनातर्फे गंगापूजन करण्यात आले होते.
पावसाळ्याच्या महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप पिके वाचविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.सध्या पावसाने दीर्घ खंड दिल्यास भुईमूग, सोयाबीनमध्ये शेंगा भरण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्यासह वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास हलक्या जमिनीवरील पिकांना फटका बसू शकतो. दुसरीकडे, पावसाचा खंड संपल्यानंतर अतिवृष्टी झाली तरी सोयाबीनमध्ये पाणी साचणे, रोग-किडीचा प्रादुर्भाव आणि शेतातील पोषणद्रव्यांचे नुकसान अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta