Friday , October 2 2026
Breaking News

ऊसाच्या फडातून ट्रॅक्टर बाहेर काढताना अपघात; शिवापूरवाडीच्या युवकाचा मृत्यू

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : ऊसाच्या फडातून भरलेला ट्रॅक्टर बाहेर काढत असताना तोल जाऊन खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. २) सकाळी बेनाडी परिसरात घडली. राहुल दशरथ खोत-देसाई (वय ४०, रा. शिवापूरवाडी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. राहुल हा खोत कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल याचा स्वतःचा ट्रॅक्टर असून तो मित्राच्या ट्रॅक्टरसोबत काम करत होता. शुक्रवारी सकाळी राहुल हा मित्रासोबत बेनाडी परिसरातील ऊसाच्या फडात ऊसतोडणीच्या कामासाठी गेला होता. ऊसतोडणी झाल्यानंतर ट्रॅक्टरमध्ये ऊस भरून झाल्यावर दोघेही ट्रॅक्टर फडातून बाहेर काढत होते.

यावेळी ट्रॅक्टरवर बसलेल्या राहुलचा अचानक तोल गेल्याने तो खाली पडला. त्याचवेळी ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. मित्र व परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला उपचारासाठी कनेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटलकडे नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

त्यानंतर शवविच्छेदन व पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात नेण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू होती.

घटनेची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा सुरू केला. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू असल्याने घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांनी सांगितले.

राहुल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ए. एस. पाटील हायस्कूलचे उल्लेखनीय यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, संचलित निपाणी स्तवनिधी मधील ए. एस. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *