






निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एचजेसी चीफ फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे रविवारी (६ डिसेंबर) १३ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संमेलन समिती अध्यक्ष एस. एस. चौगुले यांनी दिली.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर हे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. देवधर हे डी आरडीओच्या पुणे येथील एआरडीई या संशोधन संस्थेत कार्य केलेले प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचा चार दशकांचा प्रदीर्घ अनुभव असून अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. गन एक्स्पर्ट किंवा गन मॅन म्हणून ते परिचित आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरांवर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या हेतूने कुर्ली सारख्या ग्रामीण भागात ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन ही संकल्पना राबविण्यात येत आहे. दैनंदिन जीवनात अनेक समस्यांचे निराकरण वैज्ञानिक संकल्पनाच्या आधारे केले जावू शकते. का, कसे व कुठे या प्रश्नांची उकल होण्यासाठी निरीक्षण क्षमता विकसित होण्यासाठी तज्ञांचे अनुभव व जगभरातील नाविन्यपूर्ण संशोधने याची माहिती होणे गरजेचे असते. त्यासाठी या संमेलनात विज्ञान व साहित्य याची सांगड घालत विज्ञान ग्रंथ दिंडी, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान आकृती रांगोळी प्रदर्शन, फोटो प्रदर्शन, ग्रामीण संस्कृती दर्शन, प्रकट मुलाखत, बाल कथाकथन अंधश्रद्धा निर्मूलन प्रायोगिक कार्यक्रम या सत्रांचे आयोजन केले आहे. हे संमेलन विद्यार्थी शिक्षक पालक यांना उपयुक्त असल्याचे एस एस चौगुले यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आकृती रेखाटन कौशल्य विकसित करण्यासाठी या संमेलनात शनिवारी ( ता.५) जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत मारुती माने यांचे स्मरणार्थ ८ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान आकृती रांगोळी रेखाटन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यासाठी अनुक्रमे १५००, १००, ७००, ५०० व ३०० रुपये चषक व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta