हुक्केरी : शहरातील बेळगाव रोडवर असणाऱ्या हळदकेरी भागात येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण दि. १९ फेब्रुवारी होणार असून हुक्केरी शहरात वातावरण शिवमय झाले आहे.
या पार्श्वभूमीवर १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी या कामी विशेष परिश्रम घेतले आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजता रोजी प्रमुख मार्गावरून भव्य शिवमूर्तीची मिरवणूक, मंगळवारी सकाळी ७ वाजता शिवपुतळ्याची चौथाऱ्यावर प्रतिष्ठापना व धार्मिक विधी तर सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घघाटन श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालीक हे करतील. बुधवारी सकाळी ९ वाजता वल्लगडावरून येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत तर सायंकाळी ५ वाजता अश्वारूढ शिव पुतळ्याचे अनावरण आमदार निखिल कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
माजी खासदार रमेश कत्ती यांच्याहस्ते पुतळ्याचे अनावरण, कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी विद्यमान खासदार प्रियंका जारकीहोळी यावेळी यांची विशेष उपस्थिती आहे. कार्यक्रमास निडसोशी पंचम शिवलिंगेश्वर स्वामी, संकेश्वरचे शंकराचार्य स्वामी, हुक्केरीचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, क्यारकुड मठाचे अभिनव मंजुनाथ स्वामी, विरक्तमठाचे शिवबसव स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात कार्यक्रम होणार आहे.
१२ फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा हा १ टन वजनाचा असून संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मूर्तिकार बालाजी मडीलगेकर यांनी बनविला आहे.