दड्डी (वार्ताहर) : सलामवाडी (ता. हुक्केरी) येथील रहिवासी श्री. श्रावण रामू असवले (ए.एस.आय., मुंबई सेंट्रल जेल) यांचे सुपुत्र डॉ. हर्ष सुनीता श्रावण असवले यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. ही पदवी यशस्वीरित्या संपादन करून आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दड्डी परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यांच्या शैक्षणिक यशाची दखल घेत श्री हर्षद आहिरराव (एस.पी., मुंबई सेंट्रल) यांनी त्यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी डॉ. हर्ष असवले यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे व समर्पणाचे कौतुक करत भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देऊन समाजहिताचे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. हर्ष असवले यांचे यश प्रेरणादायी असून कठोर परिश्रम, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे. त्यांच्या यशामुळे सलामवाडी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. हर्ष असवले यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची कामना केली. त्यांच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाबाबत नवचैतन्य निर्माण झाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta