Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटकातील कोडगूमध्ये विदेशी महिलेवर अत्याचार

Spread the love

 

दोन आरोपी अटकेत; अमेरिकेतील दूतावासाकडून दखल

बंगळूर : अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील एका महिलेवर कोडगू जिल्ह्यातील विराजपेट विधानसभा मतदारसंघातील कुट्टा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या होमस्टेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी झारखंडमधील वृजेश कुमार आणि घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून होमस्टे मालक विशाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना ३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला कुट्टा येथील ‘देवी व्हिला’ या होमस्टेमध्ये मुक्कामाला होती. या दरम्यान आरोपी वृजेश कुमार याने तिला पेयामध्ये गुंगी आणणारे औषध मिसळून दिले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर पीडित महिला कोणाशीही संपर्क साधू नये म्हणून होमस्टेतील वाय-फाय सेवा तब्बल तीन दिवस बंद ठेवण्यात आली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारातून होमस्टे मालक विशाल याने घटना लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.

तीन दिवसांनंतर पीडित महिलेने म्हैसूरला जाण्याचा बहाणा करून तेथून अमेरिकेतील दूतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी ई-मेलद्वारे म्हैसूर पोलिसांशी संपर्क साधला. संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारीही मंगळवारी कोडगू जिल्ह्याला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक बिंदुमणी यांनी सांगितले की, “कुट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विदेशी महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.”

ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *