Sunday , September 20 2026
Breaking News

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचा दुजोरा

Spread the love

 

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला दुजोरा देत, “हायकमांडने बोलावल्यासच मी दिल्लीला जाईन. या महिन्याच्या १५ तारखेला दिल्लीला जाण्याचा कोणताही कार्यक्रम नाही,” असे स्पष्ट केले.

म्हैसूर येथील आपल्या निवासस्थानासमोर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि शैक्षणिक विषयांवर भूमिका मांडली.

ते पुढे म्हणाले, “आम्ही सर्वजण हायकमांडच्या आदेशानुसार काम करणारे आहोत. काँग्रेस हायकमांड मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना जनतेसाठी चांगले काम करण्याचे निर्देश देते. हायकमांड सांगेल तोपर्यंत आम्ही सत्तेत राहू, अन्यथा सामान्य आमदार म्हणून काम करू.”

आमदारांच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी भाजपवरही टीका केली. “दिल्लीला गेलो तर त्यात गैर काय? भाजपच्या कार्यकाळात तीन मुख्यमंत्री बदलले गेले. मग मंत्रिमंडळ फेरबदल होऊ नये का? सर्वांना संधी मिळू द्या,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, भैरती सुरेश यांनीही मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. शिमोगा येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी, “मंत्रिमंडळ फेरबदल झाला तर त्यात चुकीचे काय? त्यामुळे सर्वांना संधी मिळेल,” असे म्हटले.

केशरी शालला परवानगी नाही

हिजाबबंदी आदेश मागे घेतल्याच्या मुद्द्यावर भाजपने केलेल्या विरोधाबाबत विचारले असता, सिद्धरामय्या म्हणाले की, “फक्त हिजाबच नव्हे तर जानवे, शिवमाळ, रुद्राक्ष यांसारख्या धार्मिक प्रतीकांनाही बारावीपर्यंत परवानगी आहे. मात्र, केशरी शालला परवानगी नाही. केशरी फेटा घालण्यास मात्र हरकत नाही.”

ते पुढे म्हणाले की, “राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या परंपरा आणि प्रथांचे पालन करण्यास परवानगी आहे. मात्र, नव्या पद्धतींना मान्यता दिली जाणार नाही.”

देशात पेट्रोल-डिझेलचा मर्यादित वापर व्हावा यासाठी पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केल्याच्या निर्णयाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “इतर राज्यांमधील पद्धतींचा अभ्यास करून राज्यातही अशा उपाययोजनांचा विचार केला जाईल. मात्र, ही केवळ तात्पुरती उपाययोजना आहे. सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधानांनी इतर देशांशी चर्चा करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.

नीट परीक्षेतील गैरव्यवस्थापनावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, “नीट परीक्षा योग्य पद्धतीने घेण्यात आलेली नाही. मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.”

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *