बेंगळुरू : कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगी, बेंगळूरू विभाग आयोजित बहुभाषिक कविसंमेलन दिनांक २१ जून रोजी सायंकाळी बेंगळूरूच्या हेब्बाळ परिसरात अत्यंत उत्साहात पार पडले. बेंगळूरूच्या विविध भागांतील विविध भाषिक कवी-कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता मान्यवरांसमोर सादर केल्या. या संमेलनात विषयांचे वैविध्य, शब्दरचना आणि सादरीकरणाची शैली साहित्यविश्वात रमवून ठेवणारी होती. सर्व सादरकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाला विशेष उंची लाभली.
या संमेलनात ज्येष्ठ कन्नड साहित्यिक मा. एस. रत्ना विठ्ठलकर, ज्येष्ठ राजवंशी साहित्यिक विंग कमांडर रणजीत कुमार मंडल, ज्येष्ठ उर्दू साहित्यिक मा. मिलनसार अहमद तसेच ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉ. व्यंकटेश देवनपल्ली यांची प्रेरणादायी भाषणे झाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पितृदिनाचे औचित्य साधून बहुभाषिक कविसंमेलनाची सुरुवात मा. श्री. चिंतामणी पराडकर यांच्या हस्ते तुळशीवृंदावनाला पाणी अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मा. लीना पेंढारकर यांनी केले. बहुभाषिकांना एकत्र आणण्याचा हेतू भारतीय एकतेचे प्रतीक असल्याचे सांगत मा. दिपाली वझे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यानंतर सर्व उपस्थितांनी एकसुरात राष्ट्रगीत गायले. कार्यवाह मा. प्रतिभा टेकाडे यांनी पितृदिनानिमित्त विशेष मनोगत व्यक्त केले, तर सहकार्यवाह मा. राकेश शेटे यांनी पावसावरील कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. लीना पेंढारकर यांच्या कुटुंबीयांनी ऊन-पावसाच्या दुहेरी वातावरणात गरमागरम वडा-सांबार आणि थंडगार कैरी पन्ह्याचे आदरातिथ्य करून साहित्यरसिकांचा सन्मान केला.
कार्यक्रमाच्या दोन्ही सत्रांचे सूत्रसंचालन अत्यंत रंगतदार झाले. सुरेल आवाजाच्या डॉ. प्रतीक्षा वलगांवकर आणि हिंदी, उर्दू व मराठी कवयित्री डॉ. नम्रता कुळकर्णी यांनी कवींचे स्वागत करत त्यांच्या कवितांना समर्पक दाद दिली.
या बहुभाषिक कविसंमेलनात दिपाली वझे, लीना पेंढारकर, राकेश शेटे, डॉ. नम्रता कुळकर्णी, प्रतिभा टेकाडे, एस. रत्ना विठ्ठलकर, मिलनसार अहमद, विंग कमांडर रणजीत कुमार मंडल, डॉ. व्यंकटेश देवनपल्ली, अर्चना देसाई, परवीन कौसर, विजया उरणकर, राधेश्याम यादव, भूपेंद्र सिंह, काव्या खन्ना, त्रिशला मिश्रा, सुदेश वत्स, गीता चौबे ‘गुंज’, पूनम बेलानी, कनकलता तिवारी, प्रीती राही, राही राज, दिपाली पाटील, राजेश अरोरा, विद्याश्री हरकुडे, गीतांजली पेठकर, मेघा अलुरकर, हेमंत ठाकूरदेसाई, आसावरी वाईकर, चारुकेशी वाईकर, अजय शर्मा, प्रतिभा बिलगी, विंग कमांडर अन्सारी तसेच पुणे येथील नाना अहिरे, चंद्रकांत जोगदंड आणि जनाबापू पुणेकर अशा एकूण ३६ कवी-कवयित्रींचा सहभाग होता. मैसूर आणि पुणे येथून आलेल्या कवींची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
या संमेलनात मराठी, कन्नड, हिंदी, भोजपुरी, सिंधी, उर्दू आणि गुजराती भाषांतील कविता रसिकांना ऐकायला मिळाल्या. विविध भाषिकांच्या या मेळाव्यात साहित्याची देवाणघेवाण झाली. कर्नाटकाच्या भूमीवर राष्ट्रभाषा हिंदीसह विविध भारतीय भाषांमध्ये संवाद साधला गेला.
वर्षातून एकदा होणाऱ्या या संमेलनात शेवटपर्यंत उपस्थित राहिलेल्या रसिकांसाठी डॉ. प्रतीक्षा वलगांवकर यांनी ‘गली में आज चाँद निकला’ हे हिंदी गीत सादर करून मैफलीची सुरेल सांगता केली.
Belgaum Varta Belgaum Varta