Monday , September 21 2026
Breaking News

शाळा-रुग्णालयांच्या कॅन्टीनमधून जंक फूड हद्दपार!

Spread the love

 

कर्नाटक सरकारची मोठी तयारी, पौष्टिक आहारालाच प्राधान्य

बेळगाव : वाढता लठ्ठपणा, मधुमेह, कर्करोग आणि इतर जीवनशैलीजन्य आजारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. शासकीय व खासगी शाळा तसेच रुग्णालयांच्या कॅन्टीनमध्ये जंक फूडच्या विक्रीवर निर्बंध आणण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असून यासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र नियमावली तयार केली जात आहे.

सध्या अनेक शाळा आणि रुग्णालयांच्या कॅन्टीनमध्ये पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, पॅकेट चिप्स, साखरयुक्त शीतपेये आणि इतर प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. या पदार्थांच्या वाढत्या सेवनामुळे लहान मुलांपासून तरुणांपर्यंत लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, मूत्रपिंडाचे विकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.

याच पार्श्वभूमीवर शाळा आणि रुग्णालय परिसरात सकस, स्वच्छ आणि पौष्टिक आहार संस्कृती रुजविण्यावर भर दिला जाणार आहे. प्रस्तावित नियमावलीनुसार कॅन्टीनमध्ये जंक फूडच्या विक्रीवर निर्बंध घालून त्याऐवजी फळे, अंकुरित कडधान्ये, पौष्टिक अल्पोपहार, ताजे पेय आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

आरोग्यमंत्री यू. टी. खादर यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व सरकारी व खासगी शाळा आणि रुग्णालयांच्या कॅन्टीनमध्ये केवळ आरोग्यदायी, पौष्टिक आणि परवडणाऱ्या दरातील अन्नपदार्थांचीच विक्री व्हावी, अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होण्याची शक्यता आहे.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थी आणि नागरिकांच्या आहाराच्या सवयी बदलण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून जंक फूड संस्कृतीला मोठा आळा बसण्यास मदत होईल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शाळा आणि रुग्णालयांच्या कॅन्टीनमध्ये आता ‘चव’पेक्षा ‘आरोग्य’ला अधिक प्राधान्य मिळण्याची चिन्हे आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *