Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ; माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. २०२८ ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, मात्र जनतेच्या सेवेसाठी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले.
रविवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सिद्धरामय्या यांनी सध्याच्या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “आजचे राजकारण पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना पैसे द्यावे लागतात. प्रामाणिक लोकांसाठी राजकारणात जागा उरलेली नाही,” असे त्यांनी म्हटले.
सिद्धरामय्या म्हणाले की, वरुणा मतदारसंघातील नागरिकांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता. मात्र वाढते वय आणि प्रकृतीची साथ कमी मिळत असल्याने भविष्यात कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. “पूर्वी लोक माझ्यासाठी स्वखर्चाने निधी गोळा करून प्रचार करत होते. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सध्या ७९ वर्षांचे असलेले सिद्धरामय्या यांनी राज्य सरकारचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत जनतेची सेवा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सक्रिय निवडणूक राजकारणापासून दूर राहण्याचा त्यांचा मानस आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे दीड वर्ष शिल्लक असताना सिद्धरामय्या यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, काँग्रेससाठी हा महत्त्वाचा राजकीय धक्का मानला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *