Sunday , September 20 2026
Breaking News

धक्कादायक! माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटक अव्वल; केंद्राच्या अहवालातून वास्तव समोर

Spread the love

 

बेंगळूरू : शिक्षण हा विकासाचा पाया मानला जात असला तरी कर्नाटकमध्ये माध्यमिक स्तरावर शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण देशातील मोठ्या राज्यांमध्ये सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने प्रसिद्ध केलेल्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE+) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

अहवालानुसार, 2025-26 या शैक्षणिक वर्षात कर्नाटकमध्ये माध्यमिक स्तरावर 13.9 टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. यापूर्वी 2023-24 मध्ये हे प्रमाण 19.6 टक्के होते. त्यात काही प्रमाणात घट झाली असली तरी देशातील मोठ्या राज्यांच्या तुलनेत कर्नाटकची स्थिती अद्यापही चिंताजनक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या यादीत कर्नाटक आणि आसाम संयुक्तपणे अव्वल, तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इयत्ता नववी ते बारावी या माध्यमिक स्तराचा विचार करता, 2025-26 मध्ये कर्नाटकातील विद्यार्थ्यांचा ड्रॉपआऊट दर 18.1 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. ही आकडेवारी राज्यातील शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर आव्हान उभी करणारी असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, एकूण शालेय ड्रॉपआऊट दराच्या बाबतीतही कर्नाटकची स्थिती समाधानकारक नसून 2025-26 मध्ये राज्याचा एकूण ड्रॉपआऊट दर 14.3 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. या बाबतीत लडाख प्रथम क्रमांकावर असून कर्नाटक दुसऱ्या स्थानावर असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षणातील गळती रोखण्यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत, विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि शाळांमधील सुविधा वाढविण्याची गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *