


निपाणी (वार्ता) : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील महात्मा गांधी रुग्णालयाच्या भुयारी मार्गालगत नव्याने निर्माण केलेला भराव पावसामुळे कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या आवताडे कंपनीचे कंत्राटदार विजय दाईगडे यांच्याकडून भराव खचण्यामागील कारणांची सविस्तर माहिती घेतली. महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे करण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी विजय दाईगडे यांनी, भरावाच्या सुमारे ४० ते ५० फूट भागावर अद्याप काँक्रीटचे अंतिम काम अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाचे पाणी भरावामध्ये झिरपून माती वाहून जाऊन भरावाचा काही भाग ढासळला. पावसाचा जोर वाढल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहन साळवे यांनी संबंधित यंत्रणेला ढासळलेला भाग तात्पुरत्या दुरुस्तीवर न ठेवता तो पूर्णपणे काढून नव्याने आणि उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करून मजबूत पद्धतीने बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक निधीतून होत असलेल्या कामांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
भराव खचल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होऊ नये, तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अस्लम शिकलगार, दीपक सावंत, समीर काझी, रघुनाथ नाईकवाडे, भालचंद्र पारळे, निलेश पावले, फरीदा बुखारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta