Tuesday , September 22 2026
Breaking News

मागण्या मान्य न झाल्यास 108 रुग्णवाहिका सेवा ठप्प

Spread the love

 

मंगळवारी रात्री आठनंतर राज्यभरातील सेवा स्थगित करण्याचा इशारा; कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा निर्णय

बेळगाव : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी 108 ‘आरोग्य कवच’ रुग्णवाहिका सेवेतील कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, मंगळवारी रात्री आठनंतर राज्यभरातील रुग्णवाहिका सेवा स्थगित करून सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपल्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत आता संपली असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील भूमिका म्हणून रुग्णवाहिका सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

108 रुग्णवाहिका सेवा ही अपघातग्रस्त, गंभीर आजारी तसेच तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या रुग्णांसाठी महत्त्वाची सेवा आहे. त्यामुळे ही सेवा अचानक ठप्प झाल्यास रुग्ण आणि अपघातग्रस्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होण्याची शक्यता असल्याने आरोग्य व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी वार्षिक वेतनवाढ, समान वेतन रचना, सेवा-सुविधांमध्ये सुधारणा, तसेच सेवेदरम्यान अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई आणि कुटुंबातील सदस्याला नोकरीची हमी यांसह विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत.

या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास मंगळवारी रात्री आठनंतर बेंगळूरसह संपूर्ण राज्यातील 108 रुग्णवाहिका सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *