Tuesday , September 22 2026
Breaking News

चार दिवसांच्या शोधानंतर बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला मलप्रभा नदीपात्रात; खानापूर पोलिसांकडून पंचनामा

Spread the love

 

खानापूर : होनकल (ता. खानापूर) येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षीय मनोज मंगेश देसाई याचा मृतदेह अखेर मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) कुपटगिरी गावाजवळ मलप्रभा नदीपात्रात आढळून आला. दुपारी सुमारे २.१५ वाजता शोधमोहीमेदरम्यान मृतदेह सापडला. या घटनेमुळे देसाई कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मनोज हा शुक्रवार (दि. १८ सप्टेंबर) सकाळपासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याच रात्री सुमारे ८ वाजता त्याचा मोबाईल बंद असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. नातेवाईकांनी शोध घेतला असता, बेळगाव-गोवा महामार्गावरील कुपटगिरी गावाजवळ मलप्रभा नदीवरील पुलाखाली त्याची दुचाकी आढळून आली.

दुचाकी नदीकाठावर आढळल्याने मनोजचा नदीत शोध सुरू करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून अग्निशामक दलाचे जवान तसेच सोशल वर्कर रेस्क्यू टीमचे अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हूळी, शुभम हूळी आणि राजू टक्केकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शोध पथकांकडून नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात येत होती. मात्र, मनोजचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर मंगळवारी शोधमोहीमेदरम्यान त्याचा मृतदेह सापडला.

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

या प्रकरणाची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, घटनेमागील नेमके कारण आणि परिस्थितीचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर पीएलडी बँकेच्या कारभारात अनियमितता नाही

Spread the love  वार्षिक अहवालाबाबत नियमांचे पालन; आरोप बिनबुडाचे असल्याचा चेअरमन मुरलीधर पाटील यांचा दावा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *