Sunday , October 4 2026
Breaking News

एसएसएलसी परीक्षेची पूर्वतयारी; सहामाही परीक्षाही मुख्य परीक्षेच्या धर्तीवर

Spread the love

 

प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासाठी शाळेच्या लॉगिनवरून प्रश्नपत्रिका; ओटीपीद्वारे डाउनलोडची व्यवस्था

बेळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांना एसएसएलसी बोर्ड परीक्षेची आतापासूनच प्रभावी पूर्वतयारी करता यावी, तसेच मुख्य परीक्षेच्या पद्धतीचा सराव व्हावा, यासाठी यंदाची सहामाही परीक्षा एसएसएलसी परीक्षेच्या धर्तीवर घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सहामाही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एसएसएलसी परीक्षा ही बोर्डाची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना तिच्या पद्धतीची सवय सुरुवातीपासूनच लागावी, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना सकाळी ९.१५ वाजता शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असून, १०.३० वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे.

संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्याध्यापकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका डाउनलोड करावी लागणार आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेच्या आवश्यक प्रती काढून विद्यार्थ्यांना वितरित कराव्या लागतील. प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर संबंधित शाळेचा क्यूआर कोड असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मुख्याध्यापकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरच ओटीपी पाठविला जाणार असल्याने मोबाईल क्रमांक बदललेले असल्यास संबंधित मुख्याध्यापकांनी त्याबाबत शिक्षण विभागाकडे अर्ज करून नोंद अद्ययावत करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रश्नपत्रिका डाउनलोड आणि छपाईच्या प्रक्रियेदरम्यान गोपनीयता काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार घडल्यास त्यासाठी संबंधित मुख्याध्यापक तसेच जबाबदार सहकारी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन शाळास्तरावरच करण्यात येणार आहे. सहामाही परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया एसएसएलसी बोर्ड परीक्षेच्या धर्तीवर राबविल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळेचे नियोजन, उत्तरपत्रिका लेखन आणि परीक्षेच्या शिस्तीचा प्रत्यक्ष सराव मिळणार आहे.

बोर्ड परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांची तयारी मजबूत करण्याच्या या उपक्रमाचा त्यांच्या आत्मविश्वासासह अंतिम परीक्षेतील कामगिरी आणि गुणांवरही सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

About Belgaum Varta

Check Also

परवानगीशिवाय बंदुका बाळगणाऱ्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांकडे जमा करा : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Spread the love    बेंगळुरू : परवानगीशिवाय बंदुका बाळगणाऱ्यांनी येत्या १ नोव्हेंबरपर्यंत आपल्या हद्दीतील पोलीस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *