Monday , August 17 2026
Breaking News

मलप्रभा पाणीवळवणे प्रकरणावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी; आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी; खानापूर तालुका म. ए. समितीची मागणी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. बैठकीत खानापूर तालुक्यातील पाणी वळवणेसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विषयांवर ठराव मांडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी कळसा-भांडुरा, महादई व मलप्रभा नदीच्या पाण्याशी संबंधित चर्चेवरून काँग्रेस नेत्यांवर टीका केली. कुसमळी प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतरच पाणीवळवणुकीबाबत बातम्या का प्रसारित करण्यात आल्या, याचा संबंधितांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. आज राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असून, माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी हा प्रश्न उपस्थित करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी हा मुद्दा उपस्थित न करता सुरेश जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. खानापूर तालुका किंवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा दावा दळवी यांनी केला. महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या 40 ते 50 वर्षांपासून कळसा-भांडुरा, म्हादई तसेच खानापूर तालुक्याच्या हिताला बाधक ठरणाऱ्या विविध प्रकल्पांना विरोध केला आहे. त्यामुळे समिती काय करते, असा प्रश्न विचारण्यापेक्षा समितीने केलेल्या पाठपुराव्याची माहिती घ्यावी, असेही दळवी म्हणाले.

आमदार विठ्ठलराव हलगेकरांनी जनतेसमोर लिखित स्वरूपात भूमिका मांडावी..

खानापूरचे विद्यमान आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी संबंधित प्रकल्प नेमका काय आहे, याबाबत तालुक्यातील जनतेसमोर स्पष्ट खुलासा करणे आवश्यक आहे. त्यांनी आतापर्यंत या विषयावर ठोस भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे त्यांनी केवळ तोंडी वक्तव्य न करता पुराव्यासह लिखित स्वरूपात आपली भूमिका जनतेसमोर मांडावी, अशी मागणी दळवी यांनी केली.
आमदार हलगेकर पावसाचे पाणी तेवढेच प्रकल्पाकडे वळविण्यात येणार असल्याचे सांगत असतील, तर त्याबाबतचे पुरावे जनतेसमोर सादर करून या विषयाचा सोक्षमोक्ष लावावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वपक्षीय बैठक घेण्याचा ठराव…

या प्रश्नावर माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी. या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार, पदाधिकारी तसेच काँग्रेसच्या माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी उपस्थित राहून या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडावी, असा ठराव बैठकीत करण्यात आला.

मध्यवर्ती समितीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी

दरम्यान, मध्यवर्ती समितीच्या वतीने यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. खानापूर समितीच्या वतीने 21 ऑक्टोबर रोजी प्रकाश चव्हाण यांची तज्ज्ञ समितीसाठी निवड करण्यात आल्याचे पत्र मध्यवर्ती समितीला देण्यात आले आहे. मुंबई किंवा दिल्ली दौऱ्यावर जाताना मध्यवर्ती समितीने खानापूर समितीला विश्वासात घेऊन पुढील दौऱ्यात खानापूरच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला सहभागी करून घ्यावे. अन्यथा हा प्रश्न केवळ बेळगावपुरताच मर्यादित आहे का, याचा खुलासा मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षांनी करावा, अशी मागणीही करण्यात आली.

‘हा प्रश्न केवळ समितीचा नाही, संपूर्ण खानापूर तालुक्याचा’…

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, खानापूर तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात पाणी वळविण्याचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीचा नसून संपूर्ण खानापूर तालुक्याच्या हिताचा प्रश्न आहे. त्यामुळे समितीवर टीका करण्यापेक्षा राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि या प्रश्नावर एकत्रितपणे भूमिका मांडावी, असे त्यांनी सांगितले.

 

बैठकीत माजी आमदार दिगंबरराव पाटील, मुरलीधर पाटील, विलासराव बेळगावकर, जयराम देसाई, रणजीत पाटील, अभिजीत सरदेसाई, गोपाल पाटील, बाळासाहेब शेलार, पांडुरंग सावंत, बी. बी. पाटील, पुंडलिक रामचंद्र पाटील, रुक्माण्णा जुंझवाडकर, राजेंद्र कुलम, रमेश धबाले, मारूती गुरव व आदीजणांनी आपले विचार मांडले.

बैठकीस महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *