मुंबई : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीत देखील बिघाडी दिसत आहे. काँग्रसचे निष्ठावान असलेले सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. महाविकास आघाडीत समन्वय नसल्याची टीका होत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
सामान्य किमान कार्यक्रमावर महाविकास आघाडीचे सरकार होते. हे सरकार आम्ही चालवले. तिन भिन्न पक्षाचे लोक एकत्र आले आणि सरकार चालवले. त्यामुळे आघाडीत समन्वय होता. ज्या पद्धतीने सरकार चालवले तोच समन्वय आणि एकोपा विरोधी पक्षात काम करताना सुद्धा असावा. तरच आपण पुढील सर्व लढाया एकत्रपणे लढू शकतो, असे मत संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत म्हणाले, विधानपरीषद निवडणुकीमध्ये जो गोंधळ झाला तो झालेलाच आहे. तुम्ही नाकारु शकत नाही. त्याकडे महाविकास आघाडी म्हणून लक्ष द्यायला पाहीजे. या पाच जागांच्या निवडणुकासंदर्भात ज्या पद्धतीने एकत्रीत बसून भूमिका ठरवणे, चर्चा व्हायला पाहीजे होती, मात्र ते झालं नाही.
नागपूर, अमरावती या दोन्ही जागेसंदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे होते. अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता त्यांनी आमचा उमेदवार घेतला. आम्ही सुद्धा लढलो असतो. नाशिकचा जो घोळ झाला त्यासंदर्भात कुणालाच दोष देता येणार नाही. अशा प्रकारच्या उलट्या-पालट्या सर्वच पक्षात होत असतात, असे संजय राऊत म्हणाले.