आम आदमी पक्षाचा आरोप : मंगळवारी काढणार मोर्चा
निपाणी (वार्ता) : पाणी म्हणजे जीवन असून ती जीवसृष्टीची मूलभूत गरज असून पाण्याचे बाजार करू नये. किमान नगरपालिकेने पाण्याकडे व्यावसायिक दृष्टीकोण न ठेवता मिळकतीचे साधन बनवू नये. पाणी येण्यापूर्वी हवेच्या दाबाने मीटर फिरते. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागत आहे. त्यामुळे २४ तास योजना पाणी बंद करून पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे डॉ. राजेश बनवन्ना यांनी केली आले.
यावेळी हवे पासून करणाऱ्या मीटरचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
डॉ. बनवन्ना म्हणाले, आम आदमी पक्षाचे सरकार दिल्ली व पंजाब येथे नागरिकांना मोफत पाणी दिले आहे. भ्रष्टाचार न केल्यामुळे सरकारकडे ‘कर’रुपात आलेल्या पैशाचा योग्य विनियोग केल्यामुळे त्याचा फायदा जनतेला दिला जातो. जर मोफत देणे जमत नसेल तर किमान लोकांना जाचक त्रास होईल, अशा प्रकारे तरी पाणीपट्टी घेवू नये. २०११ पर्यंत ६७८ पाणीपट्टी होती. त्यानंतरह १४३८ अशी दुप्पट वाढ करण्यात आली. ही बेहिशोबी वाढ रद्द करून ती पूर्ववत करावी. शहरात ‘२४ तास पाणीपुरवठा’ या मथळ्याखाली पाणी योजना सुरू करण्यात आली आहे. ती पूर्णपणे अयशस्वी ठरलेली आहे. २४ तास पाणी पुरवठा कधीच नाही. अजुनही बऱ्याच भागामध्ये ४ दिवसातून एकदा पाणी येत आहे.
७ मीटर उंचीपर्यंत पाणी जात असल्याचा दावा केला असला तरी पाणी पोहोचत नाही. मीटर हे पाइप लाईन मधील हवेवर पण फिरत आहे. त्यामुळे अनेकांना बिले भरमसाट आलेली आहेत.
नवीन मीटरसाठी ८ हजार रुपये आकारले जात आहेत. हा खर्च सामान्य कुटुंबांना न परवडणारा आहे. २४ तास पाणी येण्याचा मूळ उद्देश बाजूला पडला असून पाण्याचा दुरुपयोगी होत आहे. बऱ्याच प्रभागात अद्याप २४ तास पाणी येत असल्याने ही योजना पूर्णपणे कार्यरत होईपर्यंत जुन्या पद्धतीने पाणीपट्टी वसूल करण्याबाबत नगरपालिकेत ठरावही झाला होता.
पाणी योजना व बिलांच्या संदर्भामध्ये कोणास काही तक्रारी असल्यास आम आदमी पक्षाच्या कार्यालयात लेखी तक्रार द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी आदर्श गिजवणेकर, प्रा. कांचन बिरनाळे -पाटील, वाशिम पठाण, नंदकिशोर कंगळे, दीपक कांबळे, महेश कंगळे, अक्षय कार्वेकर, इरफान बागवान, राजू हिंग्लजे, सिद्धार्थ कांबळे, लतिफा पठाण, मिताली कंगळे यांच्यासह आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
—
मंगळवारी मोर्चा
पाणीपुरवठा आणि जाचक पाणीपट्टी यासंदर्भात मंगळवार (ता.१७) दुपारी ४ वाजता आम आदमी पक्षातर्फे कार्यालयापासून मोर्चाचे आयोजन केले आहे. जाचक पाणीपट्टी रद्द करण्यासाठी या मोर्चामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.