
डॉ. स्नेहल पाटील : पडलिहाळ दृढसंकल्प कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : आजच्या आधुनिक काळात मुलांच्या प्रबोधनापेक्षा त्यांच्या पालकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. मुलांच्यामध्ये उत्तम पद्धतीचे संस्कार रुजवण्यासाठी पालकांमध्येच खऱ्या अर्थाने प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे मत डॉ. स्नेहल पाटील यांनी व्यक्त पडलीहाळ येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९२ वी जयंतीनिमित्त ‘ज्योत प्रबोधनाची, गरज काळाची दृढसंकल्प’ कार्यक्रमात पहिले पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. डॉ. आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नामपलकाचे अनावरण, प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. कपिल कांबळे यांनी बुद्धवंदना सांगितली. प्रा. प्रशांत कांबळे यांनी स्वागत केले.
डॉ. पाटील म्हणाल्या, मोबाईलच्या युगामध्ये महिला अंगाई गीत देखील विसरले आहेत. महिलांच्या जीवनामध्ये बदल घडण्यासाठी खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे.
प्रा. सुरेश कांबळे यांनी, पडलीहाळ येथील भीमसैनिकांनी सुरु केलेला हा उपक्रम सर्व भागात सुरु झाल्यास सर्व महापुरुषांचे मानवकल्याणकारी विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास पडलीहाळ येथील संयुक्त आंबेडकर नगर येथील सर्व समाज बांधव महिला, युवक उपस्थित होते. संजय कांबळे यांनी सूत्रसंचालन तर रवी कांबळे यांनी आभार मानले.