Sunday , July 26 2026
Breaking News

दुर्गंधीयुक्त पाणी न हटवल्यास आंदोलन

Spread the love

 

आंदोलन नगरातील नागरिकांच्या इशारा; नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे संताप

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील आंदोलननगर परिसरात नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यातही या भागातील गटारी तुंबल्या असून, सांडपाणी थेट रस्त्यावर आल्याने घरांसमोर दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
सध्या कडाक्याचे ऊन पडत असताना आंदोलन नगरात मात्र पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याने सांडपाण्याचा निचरा पूर्णपणे थांबला आहे. हे सांडपाणी अनेक घरांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, नागरिकांना स्वतःच्या घरात ये-जा करण्यासाठी लाकडी फळ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. फळीवरून चालताना घसरून पडण्याची भीतीही निर्माण झाली आहे. सचिन पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत आमच्या घराच्या अगदी दरवाजापर्यंत सांडपाणी साचले आहे. दुर्गंधीमुळे घरात राहणे अशक्य झाले असून आजार पसरण्याची भीती आहे. सांडपाण्यातून वाट काढण्यासाठी आम्हाला लाकडी फळी टाकावी लागली आहे. पालिकेला वारंवार कळवूनही याकडे कोणाचेच लक्ष नाही, आम्ही कर भरूनही अशा नरकयातना का भोगायच्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
साचलेल्या मैलापाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. परिसरात कॉलरा, डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांची धास्ती पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ या गटारींची स्वच्छता करून पाण्याचा निचरा करावा, अन्यथा आंदोलन नगरवासीयांतर्फे तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *