Monday , September 21 2026
Breaking News

चाऱ्याच्या टंचाईवर मुरघासचा पर्याय

Spread the love

 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण; दूध उत्पादनात होते वाढ

निपाणी (वार्ता) : ऐन उन्हाळ्यात जनावरांच्याखाद्याच्या वाढत्या दरांमुळे निपाणी भागातील पशुपालक शेतकरी आता पर्याय म्हणून मुरघासाकडे वळत आहेत. जनावरांना सकस खाद्य मिळून दुग्धोत्पादन वाढण्यास मुरघास उपयुक्त ठरत असल्याने वर्षभर चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी शेतकरी उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण करण्याच्या तयारीला लागले आहेत. तालुक्यात हिरव्या मक्याचा चारा खरेदी करून त्याचे मुरघासात रूपांतर करण्यास पशुपालकांकडून प्राधान्य दिले आहे. बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे वळले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी ते मुरघासाचा पर्याय स्वीकारत आहेत. परिणामी, हिरव्या मक्याच्या पिकाला मागणी वाढली आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांनाही अवघ्या तीन ते चार महिन्यांत चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. तयार मुरघास सहा ते सात हजार रुपये प्रतिटन दराने उपलब्ध आहे, तर शेतकऱ्यांकडील हिरवा मका सुमारे दोन हजार रुपये प्रतिटन दराने घेऊन त्याची कुट्टी केली जात आहे. पॅकिंगसाठी प्रतिबॅग सुमारे ९० रुपये खर्च येतो. मक्याचा चारा कुट्टी मशीनद्वारे कापून भरून देण्यासाठी एकरी सरासरी अडीच ते तीन हजार रुपये प्रतिटन खर्च पशपालकांना येत आहे.
मुरघास रुचकर व स्वादिष्ट असल्याने जनावरे तो आवडीने खातात. त्यामुळे चारा वाया जात नाही. सुक्या चाऱ्याच्या तुलनेत मुरघास अधिक पौष्टिक असतो. मुरघासासाठी चारा पिकाची कापणी फुलोरा अवस्थेत केली जात असल्याने जास्तीत जास्त अन्नद्रव्ये चाऱ्यात टिकून राहतात. मुरघासामुळे जनावरांची पचनक्रिया सुधारते आणि दुग्धोत्पादनात वाढ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *