Monday , May 25 2026
Breaking News

निपाणी शहरातील गंभीर मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मूलभूत समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील खराब रस्ते, दूषित पाणीपुरवठा, वाढती लाचलुचपत आणि समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त झाले झाले आहे. याबाबत संबंधितांनी या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी माजी सभापती प्रा.राजन चिकोडे यांनी पत्रकान्वये केली आहे.
पत्रकातील माहिती अशी, शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वृद्ध नागरिक, महिला, अपंग व्यक्ती आणि दुचाकीस्वारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जवाहर तलावातील गाळ नियमितपणे न काढल्याने पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांना गढूळ, शेवाळयुक्त आणि अशुद्ध पाणी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असला तरी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध कार्यक्रम, वाढदिवस, सभा-समारंभ, लग्नकार्य, बारसे, जत्रा-यात्रा तसेच देवदर्शनाच्या ठिकाणी नेत्यांची उपस्थिती दिसून येत आहे.
सामाजिक माध्यमांवर फोटो प्रसिद्ध करून प्रतिमा जपण्यावर भर दिला जात असताना शहरातील मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. जनतेच्या प्रश्नांपेक्षा प्रसिद्धीला अधिक महत्त्व दिले जात आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
शहरातील काही शासकीय कार्यालयांमध्ये वाढत्या लाचलुचपतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सातत्याने समस्या मांडत असतानाही पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची टीका होत आहे. दिलेल्या निवेदनांवर आणि तक्रारींवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. काही कार्यालयांमध्ये कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी असून वाढत्या भ्रष्टाचाराबाबतही असंतोष व्यक्त केला जात आहे. निपाणीकरांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी संघटितपणे आवाज उठविण्याची गरज व्यक्त होत आहे. युवकांनी पुढे येऊन शहराच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहर आपल्या हाती ठेवायचे असेल तर मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असलात तरी जन्मभूमी आणि कर्मभूमीच्या विकासासाठी एकदिलाने कार्य करणे आवश्यक असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *