Sunday , September 20 2026
Breaking News

अधिक मासानिमित्त निपाणी परिसरात जावईबापूंच्या आदरातिथ्याची लगबग

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या अधिक मासानिमित्त सध्या निपाणी परिसरात घरोघरी जावईबापूंच्या आदरातिथ्याची लगबग सुरू आहे. या महिन्यात जावयाला आंब्याच्या सुग्रास भोजनाचा आस्वाद देत विविध प्रकारचे वाण देऊन त्यांचा सन्मान करण्याची प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार जावयाला विष्णूरूप मानून घरी जेवण देण्यासह आर्थिक कुवतीनुसार तांब्याचे ताम्हण, निरंजन, समईपासून ते सोन्या-चांदीच्या वस्तू जावयाला भेट म्हणून दिल्या जात आहेत.मात्र, सध्या सोन्याच्या दराने गगनभरारी घेतल्यामुळे सोन्याऐवजी चांदीच्या वस्तूंना अधिक पसंती देत आहेत. सराफा बाजारात चांदीचे ताम्हण, निरंजन, समई, ताट, वाटी आणि ग्लास यांच्यादानाला विशेष महत्त्व आहे.
हिंदू धर्मशास्त्रात या काळात केलेल्या दानधर्माच आणि विष्णू उपासनेचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत जास्त मिळते, असे सांगितले जाते. अधिक मासामागे खगोलशास्त्रीय कारण आहे. सूर्य वर्ष आणि चंद्र वर्षयांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सौर वर्ष साधारण ३६५ दिवसांचे असते. तर चंद्र वर्ष ३५४ दिवसांचे असते. यात दरवर्षी सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. हा फरक वाढून तीन वर्षात साधारण ३२ ते ३३ दिवसांचा होतो. हा काळ संतुलित करण्यासाठी दर तीन वर्षांनी पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो, त्यालाच ‘अधिक मास’ म्हटले जाते. या काळात शुभ कार्ये होत नाहीत.
अधिक मासात जावईबापू, व्याही व इतर आप्तांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. अबिरसासाठी आंब्याच्या मागणीतही मोठी वाढ झाली. यात हापूस आंब्यास पसंती दिली जात आहे. अधिक मासात देवांना वाण देण्याबरोबरच दानाचेही महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे अनेक मंदिरांमध्येही महिला भाविकांची गर्दी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *