
निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, मत्तीवडे, सुळगाव आणि हदनाळ या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलवरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेने केली होती. पण त्याची दखल न घेतल्याने गुरुवारी (ता. २८) निपाणीतील पाटबंधारे आणि तालुका पंचायत कार्यालयालाही घेराव घालून टाळे ठोकून ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. त्यासाठी सकाळी ९ वाजता अक्कोळ क्रॉस वरील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ तालुक्यातील रयत संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
तब्बल २५ वर्षांपासून या पुलाचा प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात केली आहे. शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या पुलाकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने आता संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. यापूर्वी ११ मार्च रोजी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे गुरुवारी निपाणी येथील पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. तरी निपाणी आणि परिसरातील शेतकरी बांधवांनी मोर्चात सहभागी आंदोलन यशस्वी करावे. हे आंदोलन केवळ पुलासाठी नसून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीची लढाई आहे. बेनाडी येथील मातंग आणि दलित समाजामध्ये गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. मानकापूर येथे पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, यासह शेतकरी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला जागे करण्याचे काम करण्यात येणार आहे.
न्याय मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही, असा इशाराही पोवार यांनी दिला आहे.
राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळी करून त्यानंतर जुन्या पीबी रोड मार्गे हा मोर्चा पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर नेण्यात येणार आहे. न्याय मिळेपर्यंत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta