
निपाणी (वार्ता) : ऐन उन्हाळ्यात जवाहर तलावाचे पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत असल्याने शहर आणि उपनगरातील नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. विहिरी-टाक्या कुपनलिका कोरड्या पडण्याच्या मार्गावर असल्याने अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांना दिवसेंवस प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली असल्याने हजारो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून जात असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे. त्याची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाने जलवाहिन्यांची दुरुस्ती केल्याने वाया जाणारे पाणी थांबले आहे. त्यामुळे नागरिकात्मक समाधान व्यक्त होत आहे.
येथील बेळगाव नाका परिसरातील जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने तीन दिवसापासून जुन्या पी. बी. रोडवर पाणी वाया जात होते. मात्र याकडे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. उष्णतेच्या तडाख्यात प्रत्येक थेंबासाठी जनता झगडत असताना प्रशासन मात्र निवांत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत झाली. गळतीचे पाणी चक्क रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. आठ-आठ दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे ही गंभीर बाब आहे. याची दखल घेऊन माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण यांनी नगरपालिका प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. उशिरा का होईना गळतीची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनाने जलवाहिनीची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta