
सोन्या चांदीच्या दरवाढीचा परिणाम; कमी खर्चात आकर्षक दागिने उपलब्ध
निपाणी (वार्ता) : वर्षभरात सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याने मोठा आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे वन ग्रॅम सोन्याचे दागिने हा पर्याय महिलांसाठी दिलासा ठरत आहे. कमी खर्चात आकर्षक, हलके आणि आधुनिक डिझाइन उपलब्ध होत असल्याने या दागिन्यांची निपाणी सराफ बाजारात मागणी वाढली आहे.
काही वर्षांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याने पारंपरिक सोन्याचे दागिने खरेदी करणे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत ‘वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी’ हा पर्याय महिलांना परवडणारा ठरत असून, सण-समारंभ, लग्नकार्य तसेच दैनंदिन वापरासाठीही या दागिन्यांची निवड केली जात आहे.
सध्या बाजारात वन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांमध्ये विविध प्रकारांत आकर्षक डिझाइन उपलब्ध आहेत. यामध्ये गंठण, मिनी गंठण, नेकलेस, हार, मेखला, बाजूबंद, अंगठ्या, कानातील कुड्या, कानवेल, चेन, टेंपल ज्वेलरी, नथ, बांगड्या, पुतळीहार, राणीहार, गळ्यातील सेट्स यांचा समावेश आहे. या दागिन्यांमध्ये सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक फिनिशिंग आणि पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा सुंदर संगम दिसून येतो. या दागिन्यांचा वापर केवळ सणापुरता मर्यादित राहिलेला नाही. नोकरदार महिलांमध्ये दैनंदिन वापरासाठीही या दागिन्यांची पसंती दिसून येत आहे. हलके वजन, सुरक्षितता आणि आकर्षक रूपामुळे मंगळसूत्र, चेन आणि कानातील दागिने रोजच्या वापरासाठी लोकप्रिय होत आहेत.
दरांच्या बाबतीतही हे दागिने सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. गंठण २२०० ते ४००० रुपये, मिनी गंठण १५०० रुपयांपासून, नेकलेस २२०० रुपयांपासून, हार ३००० रुपयांपासून, मेखला २५०० ते ५००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. कानातील कुड्या ६०० रुपयांपासून, चेन १४०० ते २५०० रुपये, नथ ७९५ रुपयांपासून, बांगड्या २२०० रुपयांपासून तर अंगठ्या ९०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. महागाईच्या काळात कमी खर्चात आकर्षक आणि सुरक्षित दागिन्यांचा पर्याय म्हणून वन ग्रॅम सोन्याचे दागिने महिलांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचे येथील सराफ व्यवसायिक रवी शेट्टी यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta