

कोकण भागातील पावसाने पातळी वाढली; विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
निपाणी (वार्ता) : दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसापासून वाढ झाली आहे. त्यामुळे वेदगंगेचे पाणी पात्रा बाहेर पडले असून गवताचे गड्डे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत. तर नदीकाठच्या विद्युत मोटारी काढण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासह शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
कोकणातील पाणलोट क्षेत्रात निरंतर पणे पाऊस पडत आहे. परिणामी वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढदिवस वाढ होत आहे. यंदाच्या मान्सून पूर्व पावसापासून या भागाला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतीवाडीत पाणी साठून राहिले आहे. सध्या शेती पाणीपुरवठा बंद असल्याने नदीतील पाणी उपसा करण्यात आलेला नाही. शहर आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठीच विद्युत मोटारी सुरू केल्या जात आहेत.
नदी पात्रातील पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. त्यामुळे, शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीकाठावर बसविण्यात आलेल्या विद्युत मोटारी सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहेत. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बंधारे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत.
——————————————————————
दिवस-रात्र वीजपुरवठा खंडित
शनिवारी (ता.४) सायंकाळी झालेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले आहेत. तर काही ठिकाणी वाहिन्या तुटून पडल्या आहेत. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता. रविवारी दिवसभर दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडितच होता.

Belgaum Varta Belgaum Varta