

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात कार्यान्वित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन’ (एएनपीआर) कॅमेऱ्यांनी पहिल्याच मोठ्या कारवाईत आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे. मुरगूड रोडवरील ए.आय कॅमेऱ्यात एक अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत असल्याचे स्पष्टपणे कैद झाले. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात जेएमएफसी न्यायालयाने तातडीने सुनावणी घेत वाहनमालक तथा मुलाची आई मनीषा गोपाळ लोहार (वय ४४, रा. निपाणी) यांना तब्बल २५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. येथील आधुनिक ए. आय कॅमेऱ्यांच्या आधारे झालेली ही पहिलीच मोठी दंडात्मक कारवाई ठरली आहे.
ठोठावला आहे. निपाणीतील आधुनिक एआय कॅमेऱ्यांच्या आधारे झालेली ही पहिलीच मोठी दंडात्मक कारवाई ठरली आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलीस प्रशासनाने प्रमुख दहा चौकांमध्ये अत्याधुनिक एएनपीआर कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीवर २४ तास बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अशाच एका कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये अल्पवयीन मुलगा रस्त्यावरून दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढील काळातही अशाच प्रकारची कारवाई सुरू राहणार आहे.
या कारवाईबाबत बोलताना मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, यांनी पालकांना कडक इशारा दिला आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात कोणत्याही परिस्थितीमध्ये वाहनाची चावी देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. शहरात बसवण्यात आलेल्या एआय कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रात्रंदिवस बारीक लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे; अन्यथा वाहनमालकांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta